ती 56 इंचाची छाती नाही, आत सर्व पोकळ आहे राहुल गांधींचा घणाघात! त्या शक्ती विरूध्द लढा

मुंबई – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्क येथील जाहीर सभेने झाला. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीने मोठे शक्‍तिप्रदर्शन करत प्रचाराचा बिगुलही वाजविला. इंडिया आघाडीचे देशभराचे दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी, हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचाची छाती नसून पोकळ आहे. मोदी यांच्या मागे अदृश्य शक्ती असून त्या शक्तिविरुद्ध लढा.
राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या वर्षी आम्हाला काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा करावी लागली. कारण देशात संवाद बंद झाला होता. बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या, अग्‍निवीरांची समस्या हे सर्व मीडियात दिसत नाही. सोशल मीडियावरही त्यांचा कंट्रोल आहे. आम्ही भाजपाच्या विरोधात लढत आहे असे सर्वांना वाटते, पण आम्ही एका पक्षाच्या विरुद्ध लढत नाही, आम्ही नरेेंद्र मोदी या एका व्यक्तीच्या विरुद्ध लढत नाही. राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये आहे. या राज्यातील एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडून गेला तेव्हा माझ्या आईसमोर रडून म्हणाला की, माझ्याात यांच्याविरुद्ध लढण्याची ताकद नाही. मला कारागृहात जायचे नाही. हीच ती शक्ती आहे ज्याविरुद्ध लढायचे आहे.
मोदींची 56 इंचाची छाती नाही. आत सर्व रिकामे आहे. मणीपूरमध्ये हिंसाचार घडविला म्हणून तिथून मी यात्रा सुरू केली आणि उद्योगाचे केंद्र असलेल्या धारावीत यात्रा संपवली. भारतात 22 जणांकडे इतकी संपत्ती आहे जितकी 70 कोटी लोकांकडे आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करायला अनेक वर्षे लागतात, पण एका लग्नासाठी दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करतात. मागास, दलित, आदिवासींना कुठेच स्थान नाही. सरकारी अधिकारी, मीडियाचे मालक, कंपन्यांचे मालक यात यांचा समावेशच नाही. मूठभर लोक देश चालवतात.
मी सांगतो की, इव्हीएम शिवाय मोदी जिंकू शकत नाही. मत मशीनमध्ये मोजतात. तशी मशीनमधून निघणार्‍या मताच्या रिसीटची मोजणीची आम्ही मागणी केली, पण आयोग मानत नाही. नरेंद्र मोदी तुमचे लक्ष विचलित करतात. कधी थाळी वाजवायला सांगतात, कधी म्हणतात माझा अपमान केला. गेल्या 40 वर्षांत आज भारतात सर्वाधिक बेरोजगारी आहे. इथे बुटापासून शर्टापर्यंत चीनचा माल विकतो. याचा फायदा चीनला होतोच, पण इथल्या उद्योगपतींना होतो. म्हणून धारावी मोठी होऊ देणार नाहीत.
अरूण जेटली मला म्हणाले की, जमीन ताब्यात घ्यायच्या कायद्याबाबत बोलू नका. मी म्हटले, मी बोलणार. ईडीने 5 तास मला बसवून ठेवले. मग ईडीचा अधिकारी मला म्हणाला की, तुम्ही कुणाला घाबरत नाही. तुम्ही मोदीला हरवू शकता. हा भारताचा आवाज आहे. इथे प्रत्येक राज्याचा नेता आला आहे आणि बोलत आहेत. निवडणूक रोखे म्हणजे खंडणी आहे. मुंबईचा एअरपोर्ट हवा होता तर ईडी, सीबीआय पाठवली आणि एअरपोर्ट दुसर्‍याला दिला, पैसे द्या कंत्राट घ्या, बनावट कंपन्या काढतात, नोटबंदी केली, जीएसटी लागू केला, रोजगार बंद केला, छोटे धंदे बंद करीत आहेत, या विरोधात तुम्हाला लढावे लागेल. मी तुमच्यासाठी आणि देशासाठी हजर आहे. नफरत की बाजारमें, मुहब्बत की दुकान खोली.
तत्पूर्वी आज सकाळी साडेआठ वाजता राहुल आणि प्रियांका गांधी यांनी ही पदयात्रा सुरू केली. नंतर ऑगस्ट क्रांती मैदान येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 1942 मध्ये इथूनच इंग्रजांविरोधात भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोकुळदास तेजपाल हॉल येथे समाजातील सामाजिक मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशात द्वेष वाढत चाललाय. भारत जोडो यात्रेत लाखो लोक माझ्याबरोबर चालत होते. यात्रेची शक्ती हे सगळे लोक होते. ही भाजपा विरोधातील लढाई नसून दोन आत्म्यामधील लढाई आहे. देशात पेपर फुटत आहेत. व्यापार्‍यांना जीएसटीमधून दबाव टाकला जात आहे. अनेक लोक त्यांच्यावर होणारा अन्याय मला भारत जोडो यात्रेत सांगत होते. यात्रेत फक्त मी एकटा चालत नव्हतो. लाखो लोक चालत होते. ही लढाई राहुल गांधी आणि मोदी यांच्यातील नाही. तर ही लढाई सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या लोकांविरोधात आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, भारत हा प्रेमळ लोकांचा देश आहे. परंतु आता या देशात द्वेष पसरवला जातोय. पण भारत प्रेम करणार्‍यांचा देश असेल तर द्वेष का पसरवला जातो आहे. या द्वेषामुळेच गरीब, शेतकरी, दलित महिला, तरुण यांच्यावर अन्याय होतो आहे. देशात केवळ पाच टक्के लोकांनाच न्याय मिळतो. त्यांच्यासाठी सरकार, न्यायालये आणि इतर सगळ्या संस्था काम करतात. परंतु 90 टक्क्यांहून अधिक अन्यायाने ग्रासलेले आहेत. मोजक्या अब्जाधिशांची लाखो-करोडोंची कर्जे माफ होतात. परंतु शेतकर्‍यांचा एक रुपयाही माफ होत नाही. आमच्या सरकारने शेतकर्‍यांची कर्जे माफ केली, तेव्हा भाजपा म्हणाली, शेतकरी आळशी होतील. आम्ही मनरेगा आणली तर म्हणाले, मजुरांची सवय बिघडेल. आता काही उद्योगपतींची करोडोंची कर्जे माफ करून त्यांची सवय बिघडत नाही. आज एका बाजूला काही निवडक लोकांकडे सारी संपत्ती आहे, तर शेतकरी, मजदूर वंचित आहे. मला गुजरातमधील व्यापार्‍यांनी सांगितले की, जीएसटी आणि नोटबंदीमुळे त्यांना मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांना शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाची कल्पना नव्हती. जोपर्यंत आपण इतर देशवासीयांवर होणार्‍या अन्यायाविषयी जाणून-समजून घेणार नाही तोपर्यंत कुठलेही आंदोलन उभे राहणार नाही.
या सभेला फारुख अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती, एम, के. स्टॅलिन, कल्पना सोरेन, सादिक अली, तेजस्वी यादव उपस्थित असल्याने इंडिया आघाडीची शक्ती दिसली. या सभेतून इंडिया आघाडीने आपल्या प्रचाराचा बिगुल वाजवला.

शरद पवारांना दूर केले
मंचावर राहुल गांधी यांच्या शेजारी उध्दव ठाकरे बसले होते आणि दोघे एकमेकांशी सतत बोलत होते. शरद पवारांना मात्र या दोघांपासून दूर खरगे यांच्या शेजारी स्थान दिले होते. यामुळे चर्चांना उधाण आले.

भाजपा म्हणजे फुगा
उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा म्हणजे फुगा आहे. वाईट याचे वाटते की, या फुग्यात हवा भरली. हे परिवार वादाबद्दल बोलतात. पंतप्रधानांचाही परिवार आहे तो म्हणजे ते आणि त्यांची खुर्ची! आपल्या देशाची घटना बदलण्यासाठी त्यांना 400 पार जागा हव्या आहेत. ज्यावेळी सर्व एकवटतात तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. हुकूमशहाला तोडून मोडून टाकणार, ‘अबकी बार भाजपा तडीपार’ हा नारा इथून दिला आहे.

प्रकाश आंबेडकरही
सभेला उपस्थित

महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे नक्की नसताना आज शिवाजी पार्कवरील राहुल गांधी यांच्या यात्रेच्या सभेत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण एकत्र लढू किंवा वेगळे लढू. मात्र आपल्याला लढावे लागणार आहे, हे नक्की. इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा समोर आला आहे. ज्या कंपन्याचे प्रॉफीट 200 कोटी रुपये आहे. त्यांनी 1300 कोटींचे बाँड्स कसे दिले. अमित शहा यांनी त्या कंपनीकडे 1300 कोटी रुपये आले कुठून याचे उत्तर द्यावे.

आजपासून भाजपा छोडो सुरू
शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, आज देशाची जी अवस्था आहे ती बदलण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यांनी भाजपाला धडा शिकवायचा आहे. याची संधी आपल्याला पुढील महिन्यात मिळेल. मागील काही महिन्यांपासून मोदी गॅरंटीचा घोषा सुरू आहे. ही गॅरंटी चालणारी नाही. हे चुकीचे आश्वासन आहे. ते बंद केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. महात्मा गांधींनी याच शहरातून भारत छोडो आंदोलन सुरू केले होते. त्याच शहरात आज भाजपा छोडो सुरू झाले आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
राहुल गांधी यांचे वंदन

राहुल गांधी यांनी शक्‍तिप्रदर्शन करण्याआधी शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी होत्या. राहुल गांधी स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत राजकीय चर्चा होत्या. मात्र त्यांनी स्मृतिस्थळावर वंदन केल्याने या चर्चांना ब्रेक लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top