डोंबिवलीच्या मिलापनगर तलावात जलचर प्राण्यांना ऑक्सिजन मिळेना

डोंबिवली – येथील एमआयडीसीमधील मिलापनगर तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने तलावातील मासे आणि कासवांसारख्या जलचर प्राण्यांचा श्वास ऑक्सिजनअभावी गुदमरू लागला आहे.हे जलचर प्राणी ऑक्सिजन घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येवून केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत.
या तलावातील असंख्य मासे,कासव यांना नीट तळाशी ऑक्सिजन मिळत नसल्याने सकाळी सूर्यप्रकाशात या तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याने सकाळी फिरायला येणार्‍या पादचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.तरीही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळाला नाही तर हे जलप्राणी अधिककाळ जिवंत राहू शकणार नसल्याची खंत पर्यावरणतज्ञानी व्यक्त केली आहे.काही वर्षांपूर्वी याच तलावात अनेक वेळा मासे, कासव मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते.तसेच गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धे अधिक तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढला नव्हता.त्या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावर ऊन प्रकाशात कासवे येऊन बसतील. कासवांच्या पाठीला चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्या तलावात काही बेजबाबदार नागरिकांकडून निर्माल्य, कचरा फेकला जात असल्याने तलावातील पाणी खराब होण्यास भर पडत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top