मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांना २ लाखांचा डीडी देण्यास आलो होतो, मात्र त्यांनी डीडी स्वीकारला नसल्याचे मोहन चव्हाण यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या चव्हाणांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका देत केवळ प्रसिध्दीसाठी याचिका केल्याचे म्हणत दंड
म्हणून उद्धव ठाकरेंना दोन लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशात मोहन चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे यांना भेटीसाठी मातोश्री बंगल्यावर आले. या भेटीची वेळ न घेतल्याचे कारण सांगत त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मोहन चव्हाण म्हणाले की, उच्च न्यायालयाने ३ आठवड्याच्या आत उद्धव ठाकरेंना २ लाखांचा डीडी पाठवा असा आदेश दिला होता. त्यानंतर हा डीडी घेऊन आम्ही मातोश्रीवर पोहचले होतो. परंतु उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. उद्धव ठाकरे हे कोर्टापेक्षा मोठे झाले आहेत का? कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही रितसर २ दिवसांपूर्वी आपल्याला वेळ मागितली होती. आमचा डीडी ते स्वीकारत नाहीत.