ट्रम्प यांनी सरकारी वृत्तसंस्थेचे 1,300 कर्मचारी झटक्यात काढले


वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ (व्हीओए) या अमेरिकन सरकारच्या निधीवर चालणाऱ्या 75 वर्षांहून अधिक जुन्या वृत्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. ट्रम्प प्रशासनाने जगभरातील 1,300 कर्मचाऱ्यांना कुठलीही नोटीस न देता केवळ ई-मेल पाठवून त्वरित सर्व काम तडकाफडकी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 31 मार्चपासून तुमचे कंत्राट संपुष्टात येईल, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही वृत्तसंस्था सध्या बंद पडल्यात जमा आहे.
‘व्हॉईस ऑफ अमेरिका’च्या रशियन भाषिक सेवेसाठी काम करणारे व्हाईट हाऊसमधील प्रतिनिधी मिशा कोमाडोव्स्की यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’मधील माझ्यासह अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई-मेल मिळाला आहे. त्यात काम थांबवण्याची सूचना आहे. हे ई-मेल यूएस एजन्सी फॉर ग्लोबल मीडिया (युएसएजीएम)द्वारे पाठवण्यात आले असून, त्यामध्ये कर्मचाऱ्यांना एवढेच नव्हे तर त्यांना वृत्तसंस्थेच्या एजन्सीच्या इमारती किंवा प्रणालींमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.
ट्रम्प यांनी तीन दिवसांपूर्वी सही केलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ‘युएसएजीएम’चे काम पूर्णपणे बंद झाले आहे. ही संस्था ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’, ‘रेडिओ फ्री युरोप’ आणि ‘रेडिओ फ्री आशिया’ यासारख्या सरकारी अनुदानित रेडिओ संस्थांवर नियंत्रण ठेवत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी या वृत्तसंस्थेची स्थापना करण्यात आली होती. जगभरातील लाखो लोक या रेडिओ सेवेचा वापर करत होते. मात्र, ही वृत्तसंस्था ‘ट्रम्प-विरोधी’ आणि ‘कट्टरतावादी’ असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता कर्मचारी काढून टाकण्याच्या निर्णयाचे व्हाईट हाऊसने समर्थन करताना म्हटले आहे की, हा निधी तथाकथित कट्टरतावादी प्रचार टाळण्यासाठी आवश्‍यक होता.
या निर्णयावर पत्रकार संघटना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी जोरदार टीका केली आहे. ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ आणि ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स’ या संस्थांनी या निर्णयाला लोकशाहीविरोधी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासन आणि माध्यमांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नोकरकपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात व्हाइट हाऊसने ’असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई केली होती. कारण या वृत्तसंस्थेने मेक्सिकोच्या आखातासाठी ’अमेरिकेचे आखात’ असा शब्द वापरण्यास नकार दिला होता. याशिवाय पत्रकार आणि वृत्तसंस्थांना आपणच मान्यता देणार, असा निर्णयही ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. तोही माध्यमांना पटलेला नाही.
’व्हॉईस ऑफ अमेरिका’आणि इतर अमेरिकन निधीवर चालणार्या माध्यमांवर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी पूर्वीपासून पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत. एलॉन मस्क यांनी ’व्हॉईस ऑफ अमेरिका’च्या पत्रकारांना डाव्या विचारसरणीचे वेडे लोकअसे संबोधत ते बंद करण्याची मागणी केली होती. ट्रम्प यांनी मस्क यांची नेमणूक सरकारी खर्च-कपात आणि बचत यावर देखरेख ठेवण्यासाठी केली आहे. त्यांनी आता आपला वरवंटा ’व्हॉईस ऑफ अमेरिका’वर चालवला आहे.
ट्रम्प यांनी ’व्हॉईस ऑफ अमेरिका’आणि ’रेडिओ फ्री आशिया’ बंद करण्याचा निर्णयामुळे चीन आनंदला आहे. या वृत्तसंस्थांनी चीनमधील मानवाधिकार आणि तैवानशी संबंधित विषयांवर अनेकदा टीका केली होती.