टाटा सामाजिक संस्थेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई
टाटा सामाजिक संस्था अर्थात टिसच्या चार शैक्षणिक परिसरातील सुमारे ५५ सदस्यांना आणि ६० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. टाटा शैक्षणिक ट्रस्टकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्यांची सेवा समाप्त केली जात असल्याचे टिसकडून या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पाठवलेल्या ईमेलद्वारे सांगण्यात आले.
टाटा सामाजिक संस्थेच्या मुंबई परिसरातून २०, हैद्राबादमधील १५, गुवाहाटी मधील १४ तर तुळजापूरच्या ६ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. यामुळे गुवाहाटी परिसरातील कर्मचाऱ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे. सध्या टिसमध्ये केवळ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पे रोलवरीलच कर्मचारी शिल्लक आहेत. टाटा एज्युकेशन ट्रस्ट ने दिलेल्या निधीवर या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. यातील काही कर्मचारी गेल्या दहा वर्षापासून टिसमध्ये सेवा देत आहेत. त्यांचे वार्षिक करार मे महिन्यात संपले होते. त्यानंतर त्यांना पुढे काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या निधीसाठी टाटा एज्युकेशन ट्रस्ट बरोबर पत्रव्यवहार सुरु होता. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेट घेऊनही निधी देण्यासंबंधीची विनंती करण्यात आली होती. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत हे कर्मचारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे काम करत होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांना मेल पाठवून त्यांची सेवा समाप्त केल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top