बाली – इंडोनेशियातील लेओडोबी लाकी लाकी डोंगरावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे बाली विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या या प्रवाशांनी घरी परतण्यासाठी वेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे मोठे ढग निर्माण झाले असून ते आकाशात उंचावर गेले आहेत. यामुळे इंडोनेशियाच्य हवाई मार्गात अडथळे आले असून त्यामुळे विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. जेटस्टार व क्वांटास एअर लाईन्सने आपली उड्डाणे रद्द केली आहेत. तर एअर एशिया व वर्जिन एअरलाईन्सची विमाने बाली विमानतळावरच थांबलेली आहेत. सिंगापूर एअरलाईन्सने त्यांची बाली ते सिंगापूर उड्डाणे रद्द केली आहेत. इंडोनेशियातील तेंगारा परगण्यातील लोमबोक विमानतळावरील उड्डाणेही रद्द करण्यात आली असून येथील पर्यटक समुद्रमार्गे जाण्याचा काही पर्याय मिळतो, का याचा शोध घेत आहेत.
