डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा होता. त्याच दिवशी त्यांचे निधन झाल्यामुळे रसिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
आनंद म्हसवेकर यांनी अनेक नाटकांचे लेखन केले. त्यांची युटर्न, कथा, जोडी जमली तुझी माझी, जमलं बुवा एकदाचं अशी अनेक नाटके गाजली. साद, आम्ही बोलतो मराठी, तृषार्त अशा अनेक व्यवसायिक चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. भाग्यलक्ष्मी, उचापती, वाडा चिरेबंदी, दोष न कुणाचा अशा अनेक मालिकांच्या लेखनाबरोबरच दिग्दर्शक व अभिनेते अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या अनेक नाटकांना पुरस्कार मिळाले आहेत.
साताऱ्यातील म्हसवे या गावात जन्मलेल्या आनंद म्हसवेकर यांनी स्टेट बँकेत नोकरी करत आपला लेखनाचा छंद जोपासला व त्याला व्यावसायिक रूप दिले. आपल्या जीवन प्रवासाविषयी लिहिलेल्या आत्मचरित्राचे आज दुपारी चार वाजता प्रकाशन होणार होते. या कार्यक्रमाची निमंत्रणेही संबंधितांना गेली होती. या कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीच्या शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.