पुणे – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे या नगरीला सोन्याची जेजुरी म्हटले जाते आहे. परंतु जेजुरीच्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याची माहिती उघड झाली आहे. जेजुरीत येणार्या भाविक, स्थानिकांना यलो पावडर म्हणजेच नॉन ईडीबल टरमरीक पावडर या नावाने भेसळयुक्त भंडारा विकला जात आहे. यात्रा-उत्सव काळात याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात.त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ थांबवण्याची मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थांचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली.
याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले असून भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे जेजुरी गडावरील ऐतिहासिक दगडांना हानी पोहचत असल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिला आहे.
