Free child cancer medicines: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅटफॉर्म अंतर्गत हजारो मुलांना मोफत कर्करोगावरील औषधे प्रदान केली जाणार आहेत. प्रामुख्याने जो कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहणाऱ्या मुलांना औषधं प्रदान केली जातील. याचा मूळ उद्देश अविकसित देशात कर्करोगांच्या उपचारा अभावी वाढलेला मृत्यूदर कमी करणे हा आहे.
WHO ने याबाबत माहिती दिली की, उपक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात मंगोलिया आणि उझबेकिस्तानला सुरुवातीला औषधं वितरित केली जातील. यानंतर इक्वाडोर, जॉर्डन, नेपाळ आणि झांबिया या देशांमध्ये पुढील टप्प्यात औषधांचा पुरवठा केला जाईल.
या उपचारांमुळे यावर्षी जवळपास 5,000 कर्करोगग्रस्त मुलांना मदत होण्याची अपेक्षा आहे. सहा देशांमधील किमान 30 रुग्णालयांमध्ये ही औषधं उपलब्ध केली जातील. प्रायोगिक टप्प्यावर या देशांना कर्करोगावरील औषधांचा अखंडित पुरवठा विनामूल्य केला जाईल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
पुढील 5 ते 7 वर्षांमध्ये या उपक्रमांतर्गत 50 देशांमध्ये औषधांचा पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे जवळपास 1,20,000 मुलांना आवश्यक औषधांचा पुरवठा होईल. WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात अंदाजे 4,00,000 मुलांना कर्करोग होतो आणि त्यापैकी बहुतेक मुले मर्यादित संसाधन असलेल्या देशांमध्ये राहतात.