नागपूर – महायुतीच्या अतिप्रचंड यशाला आज नाराजी आणि संतापाचा सुरुंग लागला. मंत्रिपद देताना अनेक ज्येष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून डावलण्यात आल्याने या नेत्यांनी आज जाहीरपणे संताप व्यक्त केला आणि अधिवेशन सोडून गेले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडण्याची शक्यता निर्माण झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सर्वाधिक भडकले होते. ते म्हणाले की, मंत्रिपद दिले नाही हे महत्त्वाचे नाही पण माझा अपमान केला. लहान पोरासारखं मला खेळवलं, यामुळे मी दु:खी आहे. अजित पवारांना विचारण्याची गरज नाही. हे कोण आहेत? मी आता मतदारांशी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन. एक मात्र नक्की आहे, जहाँ नही चैना, वहाँ नही रहना, जिथे मान नाही तिथे सोन्याचे पान दिले तरी थांबून काय करायचे?
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज होते पण पक्षशिस्त राखून ते अत्यंत सावधानपणे आपली नाराजी व्यक्त करीत होते. छगन भुजबळ यांनी मात्र आज उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि अजित पवार गटाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याला न भेटता त्यांनी तडक आपला येवला-लासलगाव मतदारसंघ गाठला. काल ते नागपुरात आले होते. मात्र त्यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज होऊन त्यांनी शपथविधीला जाणे टाळले. त्यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांसमोर आपली नाराजी उघड करत अधिवेशनाला काही काळही न थांबता ते आपल्या मतदारसंघात परत गेले. उद्या ते येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदार आणि समता परिषदेचे कार्यकर्ते यांच्याशी सकाळी 11 वाजता बोलणार आहेत. त्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या या नाराजीबाबत फारसे वक्तव्य न करता जरांगे पाटील यांनी उद्यापासून आमरण उपोषणाची सुरुवात करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होऊन म्हणाले की, मी सातवेळा विधानसभेवर निवडून आलो आहे. तरीही आज मला मंत्रिपद देण्यात आले नाही. ओबीसी आणि मागासवर्गीय आणि माझे मतदार दु:खी झाले आहेत. ते रस्त्यावर उतरू लागले आहेत. केवळ मंत्रिपद दिले नाही म्हणून नाराज नाही. मंत्रिपद येते जाते. मी विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केले आहे. मी सतत संघर्ष केला आहे. 1985 ते 1990 मी शिवसेनेचा एकटा आमदार होतो तेव्हाही मी सर्वांना अंगावर घेऊन उत्तरे दिली. त्यामुळे मंत्रिपद याला महत्त्व नाही. पण ज्या पद्धतीने वागणूक देऊन मला सतत अपमानीत केले जात आहे त्याने मी दु:खी झालो आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेवेळी मी शरद पवारांबरोबर होतो. अजित पवारांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांनी माझ्याकडे विचारणा केली आणि मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर सर्व वार मी एकट्याने झेलले. शरद पवारांनी येवल्यातून माझ्या विरोधात सभा घेतली. बीडमध्ये आमदारांची घरे जाळली तेव्हा कुणीही बोलले नाही. त्यावेळी मी म्हटले की, मला आता बोलावेच लागेल आणि मी तिकडे जाऊन पाहणी केली आणि त्यावर बोललो. गेल्यावर्षी 19 नोव्हेंबरला राजीनामा देऊन मी ओबीसींच्या एल्गार रॅलीला गेलो होतो त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितले की, राजीनामाबद्दल काही बोलू नका. त्यांच्या सांगण्यावरून मी गप्प बसलो. मी ज्येष्ठ मंत्री आहे. मी सर्वात ज्येष्ठ आमदारही आहे. मी शोभेचा मंत्री नाही. सतत लढा देत राहिलो, संघर्ष करीत राहिलो, ओबीसी समाज माझ्यामुळे महायुतीच्या मागे उभे राहिला. लाडकी बहीण उभी राहिली. आमचा विजय झाला. मग मला डावलण्याचे कारण काय? जुने झाले की फेकून द्या असे चालत नाही.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मी लोकसभेला लढण्याची तयारी केली होती. एक महिना माझी तयारी सुरू होती. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे तिघेही मला सतत सांगत होते की, मोदी आणि शहांनी तुम्हालाच तिकीट देण्यास सांगितले आहे. तुम्ही तयारी करा, पण एक महिना झाला तरी माझे नाव जाहीर होईना. अखेर मी माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागा आमच्या गटासाठी उघड झाल्या. त्यातील एक जागा सुनेत्रा पवार यांना दिली. त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. दुसरी जागा मला मिळेल असे सांगितले होते, पण ऐनवेळी नितीन पाटील यांना ती जागा दिली. नितीन पाटील यांना खासदारकी का दिली? तर अजित पवार हे जाहीर सभेत म्हणाले होते की, त्यांना केंद्रात पाठवेन. त्यांच्या जाहीर सभेतील वाक्याचा मान राखण्यासाठी मला डावलून नितीन पाटील यांना खासदारकी दिली. मग मला सांगितले की, तुम्ही विधानसभेत निवडणुकीला उभे राहा. तुमच्यामुळे पक्षाला ताकद मिळेल. मी विधानसभेला उभा राहिलो. जरांगे प्रकरण माझ्या भोवती फिरत होते. तरीही मी एकट्याने तोंड दिले आणि जिंकून आलो. 8 दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितले की, आता तुम्ही राज्यसभेवर जा. नितीन पाटील यांना आम्ही राजीनामा द्यायला सांगतो. नितीन पाटील यांचा राजीनामा का घ्यायचा आहे? याचे कारण म्हणजे त्यांचे भाऊ मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे होते. एकाच कुटुंबात दोघांना पद नको म्हणून मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी नितीन पाटील यांचा राजीनामा घ्यायचे ठरले होते. त्यांच्या या अॅडजस्टमेंटसाठी मला राज्यसभेवर जायला सांगत होते. पण मी राज्यसभेवर जायला नकार दिला. मी त्यांना म्हणालो की, मी आताच निवडून आलो आहे. माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आता राज्यसभेवर जायचे तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. माझ्या मतदारांशी प्रतारणा करावी लागेल. मला असे लहान मूल असल्यासारखे खेळवत आहेत. मी खेळणं आहे का? मला विचारतात की तुमच्या बॉसशी (अजित पवार) बोललात का? मी विचारतो कोण बॉस. गेली दोन दिवस मी कुणाशीही बोललेलो नाही. मी एकच सांगतो की, जिथे मान नाही तिथे सोन्याचे पान दिले तरी थांबणार नाही. संपूर्ण आयुष्य मी संघर्ष करीत आलो आहे. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा मी संघर्षच करीत राहीन.
छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना उबाठाचे संजय राऊत म्हणाले की, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळते आहे. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ म्हणाले की, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहिजे.
भुजबळ समर्थक आक्रमक
भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ समर्थकही नाराज झाले आहेत. येवला मतदारसंघासह जिल्हाभरातील भुजबळ समर्थकांनी भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने निषेध नोंदवला केला. समर्थकांनी आंदोलने करून पक्षाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णयही घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक कार्यालयाबाहेर टायर जाळून अजित पवारांचा निषेध केला. तसेच येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासाच्या जवळपास रास्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर-पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तर जालनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन केले.