कोल्हापूर – शिरोळ येथील शहीद जवान सूरज भारत पाटील (२४) यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. शनिवार २९ मार्चला ही दुर्दैवी घटना घडली. त्यांचे पार्थिव रविवारी ३० मार्चला दिल्लीत आणल्यानंतर पुण्यात आणण्यात आले, जिथे बॉम्बे इंजिनियर बटालियनमार्फत त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर काल सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव शिरोळ येथे आणल्यानंतर, नागरिक आणि विविध संस्था यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांच्या अंत्ययात्रेच्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी रेखाटून पुष्पवृष्टी केली. “अमर रहे अमर रहे, सूरज पाटील अमर रहे” अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. मुस्लिम समाजाने ईद पठणापूर्वी श्रद्धांजली अर्पण केली, तर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून शहीद जवानाला आदरांजली वाहण्यात आली. सुरज पाटील यांचे पार्थिव घरी आल्यावर आई-वडील, बहिण व अन्य नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अनेकांना अश्रू अनावर झाले.
