जळगाव जिल्ह्यातील प्रयोगशाळेत दारूच्या बाटलीत पाण्याचे नमुने

जळगाव – सरकारी कार्यालयात दारुच्या बाटल्या आढळणे हे काही नवीन नाही. मात्र जळगावच्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. धक्कादायक बाब अशी याच दारूच्या बाटल्यांमध्ये पाण्याचे नमुने ठेवले असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासण्यासाठी आणलेले पाणी चक्क दारूच्या बाटल्यांमध्ये ठेवले जात होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे यांनी उघड केली आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी तत्काळ वरिष्ठ भू वैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वास्तविक जिल्हा परिषदेमार्फत पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी उच्च प्रतीचा दर्जा असलेल्या एकूण ६६८२ बाटल्यांचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला वाटप करण्यात आले आहे. तरीही दारूच्या बाटलीत पाण्याचे नमुने का ठेवले जात होते असा प्रश्न उपस्थित केला आहे. पावसाळा सुरू झाल्याने दूषित पाण्याद्वारे होणारे संसर्ग रोग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे पाण्याचे नमुने गोळा केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top