जयंत पाटील -अजित पवार भेट! पक्ष त्यागाची शिळी चर्चा सुरू


पुणे- मांजरी येथील वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दरवाजाआड 30 मिनिटे भेट झाली. यामुळे जयंत पाटील पक्ष सोडणार या सततच्या शिळ्या
चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. जयंत पाटील भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होते. ती थांबली की ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा सुरू होते. आजच्या भेटीचे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या खोलीत काय चालले हे जाता जाता शरद पवारांनी पाहिले. तेही कारखाना बैठकीला आले होते.
प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर जयंत पाटील आता कुठेही जाण्याची शक्यता नाही. कारण आता त्यांना पक्ष बदलायचा तर शरद पवार गटाचे सर्वच आमदार घेऊन जावे लागेल. कारण तसे केले नाही तर त्यांची आमदारकी जाऊ शकते. संपूर्ण पक्ष घेऊन जायचा इतकी त्यांची स्वतःची पकड नाही. हे काम भाजपा किंवा अजित पवार यांना करावे लागेल आणि सध्या दोघांनाही आणखी आमदारांची गरज नाही. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर ‘शिळ्या कढीला ऊत’ आणण्यापलिकडे लगेच काही घडण्याची शक्यता नाही.
आज पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीसाठी अजित पवार हे सकाळी 8 वाजताच्या सुमारास बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यावेळी अजित पवारांनी उपस्थित नागरिकांची निवेदन स्वीकारली, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले असल्याचे अजित पवारांना समजले. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. काही वेळात शरद पवार बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील बसलेल्या केबिनकडे कटाक्ष टाकला. काही सेकंद ते थबकले. मात्र आत न जाता पुढे निघून गेले.
जयंत पाटील भेटीवर अजित पवार म्हणाले की, या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेकजण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले होते. यावर जयंत पाटलांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. शुगर इन्स्टिट्यूटची बैठक 10 वाजता होती. मध्ये 10 ते 15 मिनिटांचा वेळ होता. म्हणून आम्ही चर्चा केली.