जपानमध्ये पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या पार्श्वभूमीवर त्सुनामीचा देखील इशारा देण्यात आला आहे. जपानच्या नैऋत्ये भागात 6.8 तीव्रतेचे भूकंपांचे धक्के जाणवले, यामुळे त्या भागात दोन लहान त्सुनामी निर्माण झाल्या.
भूकंपाचे केंद्र मियाजाकी प्रांतात होते. यामध्ये आतापर्यंत कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही. भूकंपावेळी मियाजाकी स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात आल्या होत्या. तसेच, त्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन किनारी भागातील रहिवाशांना तेथून हलवण्यात आले आहे. जपान रिंग ऑफ फायरवर स्थित असल्याने सतत भूकंप होत असतात.
जपानमध्ये वारंवार भूकंप येण्याचे कारण काय?
रिंग ऑफ फायर हे जपानमध्ये वारंवार भूकंप येण्याचे मुख्य कारण आहे. रिंग ऑफ फायर हा पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीला व्यापणारा एक मोठा पट्टा आहे. हा भाग भूकंप आणि ज्वालामुखीसाठी ओळखला जातो. हे क्षेत्र पॅसिफिक महासागरात स्थित आहे. जपान याच भागामध्ये स्थित आहे. या भागात टेक्टोनिक प्लेट्सची एकमेकांशी टक्कर होत असते. त्यामुळे वारंवार भूकंप येतात.
रिंग ऑफ फायर हे अमेरिका, इंडोनेशिया, मॅक्सिको, जपान, कॅनडा, ग्वाटेमाला, रशिया, चिली, पेरू आणि फिलिपीन्ससह 15 इतर देशांमधून जाते. जगातील 90 टक्के भूकंप याच भागात होतात.