टोकियो – म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता जपानमध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा देण्यात आला आहे. सरकारी अहवालानुसार, लवकरच जपानमध्ये ९ रिश्टर क्षमतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे. यात सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर तेरा लाख लोक बेघर होतील. या भूकंपामुळे त्सुनामी येऊन अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जवळपास दोन ट्रिलियन डॉलरचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नानकाई ट्रफ या जपानच्या नैऋत्य पॅसिफिक किनाऱ्यावरील ९०० किमी लांबीच्या भूकंपीय क्षेत्रात हा भूकंप होण्याची ८० टक्के शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत या भागात भूकंपाचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी येथे ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. हा भूकंप भविष्यातील मोठ्या भूकंपाचा संकेत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हा भूकंप हिवाळ्यात रात्री झाल्यास त्सुनामी आणि इमारती कोसळल्याने मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान सरकारने संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.