पुरी – जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडार आज पुन्हा उघडण्यात आले. १४ जुलैला हे रत्नभांडार उघडण्यात आले होते. त्यानंतर दोन सणांमुळे ही मोजणी ३ दिवस बंद करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी ८ वाजल्यानंतर ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. रत्नभांडाराच्या मोजदादीमुळे आज सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला असून केवळ अधिकृत व्यक्ती व सेवकांनाच प्रवेश देण्यात आला. यापूर्वीच १९७८ साली या रत्नभांडारातील दागिन्यांची मोजणी झाली होती.
रत्नभांडारातील दागिन्यांच्या मोजदादीबरोबरच रत्नभांडाराच्या आतील देखभालीचे कामही या दरम्यान केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे काम केले जाणार आहे. सर्वात आधी हे रत्नभांडार रिकामे केले जाईल. त्यावेळी आतील दागिने मोठ्या संदुंकांमध्ये भरून मंदिराच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कोषागारात ठेवण्यात येतील. ४६ वर्षानंतर १४ जुलै रोजी हे रत्नभांडार पहिल्यांदा उघडण्यात आले तेव्हा रत्नभांडारातून ६ संदुक भरुन दागिने बाहेर काढण्यात आले. जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडारातील दागिने ठेवण्यासाठी एकूण १५ संदुकांची मागणी नोंदवण्यात आली आहे. रत्नभांडारात साप असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सर्पमित्र पथकाचीही नेमणूक करण्यात आली असली तरी अद्याप त्यांना कोणताही साप आढळलेला नाही. सरकारने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही मोजदाद होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन यांनी दिली आहे. रत्नभांडारात सीसीटीव्हीसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.