चौदा हजार कोटींच्या बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक! भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली- सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली. चोक्सीला कर्करोगाची लागण झाली असून, तो बेल्जियममध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती गेल्या फेब्रुवारी महिन्यात चोक्सीच्या वकिलांनी मुंबईतील अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयात दिली होती. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने बेल्जियम सरकारकडे चोक्सीला अटक करून आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली होती. त्यानुसार शनिवारी बेल्जियम पोलिसांनी एका खासगी रुग्णालयातून त्याला अटक केली. या घडामोडींशी संबंधित उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आज ही माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. चोक्सीला अटक झाल्यामुळे आता भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा मेहुल चोक्सी हा मामा आहे. या मामा-भाच्याने पंजाब नॅशनल बँकेच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेची बनावट हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) तयार केली. या बनावट हमीपत्रांच्या सहाय्याने त्यांनी परदेशांमध्ये बँकांकडून मोठ्या रकमेची कर्जे मिळवली. तसेच परदेशांत क्रेडीट सुविधा मिळवून बँकेची सुमारे चौदा हजार कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे.
65 वर्षीय मेहुल चोक्सी हा भारतातील गितांजली जेम्स लिमिटेड या कंपनीचा मालक आहे. हिरेजडीत दागदागिन्यांची निर्मिती करणारा हा उद्योग सन 2018 मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर बंद पडला. त्याच वर्षी चोक्सी भारताबाहेर फरार झाला. सुरुवातीला त्याने अँटिग्वा आणि बर्बुडा या देशांचे नागरिकत्व मिळवले होते. गेल्या वर्षी तो बेल्जियममध्ये वास्तव्यास आला. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी मुंबईतील ईडीच्या विशेष न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती. चोक्सीला कर्करोगाची लागण झाली असून, तो उपचारासाठी बेल्जियमला गेला आहे. तिथे तो पत्नी प्रिती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत आहे, असे ॲड. अगरवाल यांनी सांगितले होते. त्यावरून तपास यंत्रणांनी बेल्जियम सरकारला ही माहिती देऊन चोक्सीला अटक करून गुन्हेगार प्रत्यार्पण करारान्वये चोक्सीला भारताच्या स्वाधीन करण्याची विनंती केली होती. त्यावरून बेल्जियम पोलिसांनी एका हॉस्पिटलमधून चोक्सीला अटक केली. या हॉस्पिटलमध्ये तो गेले वर्षभर उपचार घेत होता, असे पोलीस चौकशीत उघड
झाले आहे.
चोक्सीला बेल्जियममध्ये अटक झाल्याच्या वृत्ताला आज त्याचे वकील ॲड. अगरवाल यांनी दुजोरा दिला. चोक्सी सध्या बेल्जियम पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथे त्याच्या जामिनासाठी आम्हाला अर्ज करता येणार नाही. पण त्याला वैद्यकीय कारणास्तव दिलासा मिळावा. तसेच त्याला स्वतःचा बचाव करण्याची संधी देण्यात यावी, भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देता यावे, यासाठी आम्ही तेथील न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे ॲड. अगरवाल यांनी सांगितले.
दुसरीकडे चोक्सीला प्रत्यार्पणाच्या माध्यमातून भारताच्या स्वाधीन करण्यास आधार म्हणून भारत सरकारच्या वतीने त्याच्याविरोधात विशेष न्यायालयाने 2018 आणि 2021 मध्ये जारी केलेल्या अटक वॉरंटच्या प्रति बेल्जियम सरकारला सुपूर्द केल्या जाणार आहेत.
भारतीय तपास यंत्रणांना गेली सात वर्षे गुंगारा देणाऱ्या चोक्सीला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मे 2021 मध्ये त्याला डोमिनिका या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हादेखील भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले होते. मात्र डोमिनिकाच्या न्यायालयाने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी पुन्हा अँटिग्वाला जाण्याची परवानगी दिल्याने प्रत्यार्पणाचे प्रयत्न अपयशी ठरले होते. मात्र त्यानंतर ईडीने चौक्सीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून 2 हजार 550 कोटींची संपत्ती जप्त केली होती.यामध्ये मुंबईतील त्याच्या मालकीचा फ्लॅट, महागडी मनगटी घडाळे, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, मौल्यवान रत्न आणि एक मर्सिडीस बेंझ आदिंचा समावेश आहे.
पीएनबी घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. चोकसी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेतील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेची बनावट हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) तयार केली. या हमीपत्रांच्या साह्याने त्यांनी परदेशांतून मोठ मोठ्या रकमेची कर्जे मिळवली.
या घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयामार्फत (ईडी) सुरू आहे. ईडीने या प्रकरणी चोक्सीशी संबंधित 2 हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबईतील ईडीच्या विशेष न्यायालयाने या मालमात्तांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा प्रक्रिया ईडीने सुरू
केली आहे.
आता चोक्सीला बेल्जियममध्ये अटक झाल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया भारत सरकारच्या वतीने सुरू केली जाणार आहे. त्याला भारतात आणल्यानंतर त्यांची कसून चौकशी करून या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न ईडी करणार आहे.