चेन्नई महापौरांचा पुत्र वेत्रीचा सतलज नदीत शोध सुरूच

  • कुटुंबाकडून शोधणार्‍यास
    १ कोटींचे बक्षिस जाहीर

सिमला- चेन्नईचे माजी महापौर सईदाई दुराईसामी यांचा मुलगा वेत्री दुराईसामी (४५) हा हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात कारसह सतलज नदीत पडल्याची घटना रविवारी घडली. तेव्हापासून वेत्री दुराईसामी हा बेपत्ता असून आज तिसर्‍या दिवशीही त्याचे शोधकार्य सुरूच होते. दरम्यान,आज जो कोणी त्याचा शोध घेईल त्याला त्याच्या कुटुंबाने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

वेत्री दुराईसामी यांची कार सतलज नदीत कोसळल्यानंतर चालकाचा मृतदेह काही तासांनंतर शोध पथकाने बाहेर काढला, मात्र तेव्हापासून अद्याप वेत्रीचा शोध लागलेला नव्हता.वेत्री आणि गोपीनाथ (३२) हे हिमाचलच्या लाहौल-स्पिती जिल्ह्यातील स्पिती खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते आणि दोघेही स्पीतीहून सिमल्याच्या दिशेने परतत होते.त्यावेळी स्पीतीमधील ताबो येथील रहिवासी तेन्झिनने गाडी चालवत होता.राष्ट्रीय महामार्ग-५ वर कारचे नियंत्रण सुटून कार सतलज नदीत कोसळली.जेव्हा कार उलटू लागली तेव्हा गोपीनाथ खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.
त्याला किन्नौरमधील रेकाँग पीओ येथील प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. किन्नौरचे उपायुक्त अमित कुमार शर्मा म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने वेत्रीच्या शोधासाठी १०० हून अधिक पोलीस,लष्कर आणि एनडीआरएफचे जवान आधीच तैनात केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top