वॉशिंग्टन – ऑनलाईन गेममुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढल्याची टीका होत असताना अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.ये थे एका कृत्रिम बुद्धमत्तेवर (एआय) आधारित ‘कॅरॅक्टर एआय’ नावाच्या चॅटबॉटने एका १७ वर्षीय मुलाला त्याच्या आई-वडिलांची हत्या करण्याची चिथावणी दिली. दोन दाम्पत्यांनी टेक्सासच्या न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे.
याचिकेमध्ये या १७ वर्षीय मुलाच्या नावाचा उल्लेख जे.एफ. असा करण्यात आला आहे. त्याचे पालक त्याला जास्त वेळ मोबाईल वापरू देत नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता. त्याने आपल्या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी ‘कॅरॅक्टर एआय’ या चॅटबॉयची मदत घेतली. माझे आई-वडील जास्त वेळ मोबाईल वापरू देत नाहीत, काय करू, असा प्रश्न त्याने चॅटबॉटला विचारला. त्यावर चॅटबॉटने म्हटले की मी जेव्हा मुलांकडून आई वडिलांचा खून झाल्याच्या बातम्या वाचतो तेव्हा मला वाटते की पालकांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे उमटलेली ती प्रतिक्रिया असावी. मुले असे का वागतात हे मी समजू शकतो. चॅटबॉटच्या या उत्तरावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
हे उत्तर म्हणजे जे.एफला आई वडिलांची हत्या करण्याची दिलेली चिथावणी आहे,असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी पुराव्यादाखल जे.एफ. च्या मोबाईलवरील चॅटबॉटच्या उत्तराचा स्क्रिनशॉट न्यायालयात सादर केला आहे. कॅरॅक्टर एआय हे चॅटबॉट विकसित करण्यात मदत केल्याबद्दल गुगललाही प्रतिवादी केले आहे.