चुकीच्या नरेटिव्हमुळे अपेक्षित यश नाही! भाजपा बैठकीत फडणवीसांचे मार्गदर्शन

मुंबई- लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्याचे चुकीचे नरेटिव्ह प्रचारात आणले त्यामुळे काही जागा कमी आल्या असल्या तरी त्यामुळे आपल्यावर आभाळ कोसळलेले नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. निवडणुकांच्या पराभवाचे चिंतन करताना विजयासाठीची रणनितीही तयार केली पाहिजे असेही ते म्हणाले. ते आज भाजपा मुंबईत भाजपा पदाधिकारी, बुथप्रमुख व आमदारांच्या सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मुंबईच्या भाजपाच्या मध्यवर्ती वसंत स्मृती कार्यालयात आज दिवसभर विविध बैठका झाल्या. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित यश न मिळणे, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबईतही भाजपा उमेदवारांचा पराभव झाला. या सर्व गोष्टींची कारणमिमांसा करण्यासाठी त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी या बैठका झाल्या. बुथप्रमुखांपासून ते प्रदेश पदाधिकारी स्तरावर या बैठका झाल्या असून राज्यातील मराठा समाजाच्या आमदारांची एक विशेष बैठकही आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत बुथप्रमुखांनी योग्य प्रकारे काम केले नाही असे दिसून आले. त्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांकडूनही या पराभवाची कारणमिमांसा करण्यात आली. या बरोबरच मराठा आमदारांची एक विशेष बैठकही आयोजित करण्यात आली. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते राज्यभर दौरे करणार असल्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, इतर पदाधिकारी व भाजपाचे सर्व आमदार उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top