चिपळूण- तालुक्यातील सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यांवर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे, तर तीनही ठिकाणची कागदपत्रे जप्त केली आहेत.गुजरात ईडी कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर ही धडक कारवाई केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
नाशिकमध्ये विनापरवाना खैरतोड करून येथील खैराचे लाकूड सावर्डेमध्ये आणल्याचा नाशिक वनविभागाचा संशय आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभर छापा टाकण्यात आला. दहिवली,सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराचे लाकूड तसेच तयार केलेला ज्यूस आणि कात वनविभागाने जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच याठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून खैरसाठा जप्त केला होता.याप्रकरणात सावर्डे येथील दोघांना अटक केली होती.दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवल्याचा संशय या दोघांवर होता. यातून ही कारवाई झाली होती.आता पुन्हा एकदा नाशिक वनविभागाने कारवाई केल्यानंतर कात उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. हा छापा गुजरात ईडीच्या आदेशाने झाल्याचे नाशिक येथील वनविभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.