चारधाम यात्रेतील खेचरांना गंभीर विषाणूची लागण

डेहराडून – उत्तराखंडमधील चारधाम यात्रा येत्या ३० एप्रिलपासून सुरु होत असून या यात्रेसाठी आतापर्यंत १० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. यात्रा सुरु होण्याआधी चारधाम यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही घोडे व खेचरांना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे उत्तराखंड सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.रुद्रप्रयागमधील १२ घोडे व खेचरांना अक्वाइन इन्फ्लूऐंजा विषाणूची लागण झाल्याचे पशुपालन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अर्थात या विषाणूची लागण मानवाला होऊ शकत नसल्याने काळजीचे कारण नसल्याचे म्हटले जात आहे.चारधाम यात्रेत यमुनोत्री, केदारनाथ, रुद्रप्रयाग व हेमकुंड साहिबच्या पायी परिक्रमेच्या वेळेस या घोड्यांचा किंवा खेचरांचा वापर करण्यात येतो. दरवर्षी ८ ते ९ हजार घोडे व खेचर भाविकांना सेवा देतात. दररोज १८ हजार भाविक त्यांचा वापर करत असतात. घोडे व खेचरांमधील या नव्या आजारपणामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी उत्तराखंड सरकारवर आली आहे. सरकारने संक्रमित घोड्यांना या मार्गावर प्रवास करण्याची परवानगी नाकारली असून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना निगेटिव्ह प्रमाणपत्र मिळेल त्यांनाच व्यवसाय करण्याची परवानगी मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.