चप्पल आणि स्विम सूटवर गणपतीचा फोटो! वॉलमार्टच्या ऑनलाइन विक्रीवरून वाद

वॉशिंग्टन – ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टच्या वेबसाईटवर हिंदू देवतांची चित्रे असलेली चप्पल आणि स्विम सूट विकण्यावरून खळबळ उडाली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने वॉलमार्टवर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप करत या उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी वॉलमार्टला पत्र लिहून हिंदू भगवान श्रीगणेशाच्या प्रतिमेचा अयोग्य आणि अपमानास्पद वापर केल्याचे म्हटले आहे. वॉलमार्टनेही यावर कारवाईचे आश्वासन दिले.

यानंतर वॉलमार्टने वेबसाइटवरून ही उत्पादने काढून टाकली. याबाबत माहिती देताना हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने स्वतः वॉलमार्टचे आभार मानले आहेत. वॉलमार्ट कंपनीच्या वेबसाईटवर ही उत्पादने विकली जात असली तरी ती भारतात खरेदीसाठी उपलब्ध नव्हती.