घरात नोटांचे घबाड सापडले तरी न्या. वर्मांचा गुपचूप शपथविधी ? वकील असोसिएशनचा आक्षेप

अलाहाबाद- ज्यांच्या घरात नोटांचे घबाड सापडले त्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा काल अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून गुपचूप शपथविधी करण्यात आला. यामुळे वकील संतप्त झाले आहेत. अलाहाबाद बार असोसिएशनने या शपथविधीला तीव्र आक्षेप घेतला आहे.

न्या. वर्मांच्या शपथविधी संदर्भात बार असोसिएशनने म्हटले आहे की, शपथविधीसाठी सार्वजनिक समारंभ आयोजित करायला हवा होता. गुपचूप शपथविधी हे घटनेचे उल्‍लंघन आहे. सर्व गोष्टी पारदर्शकतेने करण्याची शिकवण घटना देते. मात्र या शपथविधीची माहिती बारला देण्यात आली नव्हती. आम्ही या प्रकाराचा निषेध करत आहोत.

न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्यानंतर त्यांना दिल्‍ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद या त्यांच्या मूळ न्यायालयात पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोवर त्यांना न्यायदान न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असूनही त्यांचा लपून शपथविधी करण्यात आला. न्या. वर्मा यांच्या दिल्‍लीतील शासकीय निवासस्थानी आग लागली. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण केले. आग विझवण्याची प्रक्रिया सुरू असताना घरातील एका खोलीत नोटांची पुडी सापडली. आगीत त्यातील काही नोटा जळाल्या होत्या. या नोटा माझ्या नाहीत असा दावा न्या. वर्मा यांनी केला असून, याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांची गुजरातला बदली केली.

बार असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत या घटनेचा निषेध करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. असोसिएशनचे सरचिटणीस विक्रांत वर्मा यांनी म्हटले आहे की, आम्ही या ठरावाची प्रत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही दिली आहे. त्यानंतरही अशा प्रकारे हे गुप्तपणे शपथविधी आयोजित करण्यात आला. या शपथविधीत सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. या शपथविधी समारंभाचे निमंत्रणही बार असोसिएशनला देण्यात आले नाही. यामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वास उडेल.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी 14 मार्च रोजी जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. त्यानंतर
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर वर्मा यांची अलाहाबाद न्यायालयात बदली करण्यात आली होती. काल त्यांनी अलाहाबाद न्यायालयात न्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे सध्या कुठलेही प्रकरण सोपवण्यात आलेले नाही. तरीही त्यांच्या शपथेला अलाहाबाद आणि लखनौ बार असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला. न्यायव्यवस्थेमध्ये वकीलही महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यांचेही मत विचारात घ्यावे, अशी मागणीही बार असोसिएशनने केली आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.