Gautam Adani: अदानी ग्रुपचे अध्यक्ष आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचा दिवा शाहसोबत विवाह पार पडला. हा विवाह अत्यंत खासगी आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. या सोहळ्यास फक्त कुटुंबातील जवळचे सदस्य आणि निवडक मित्रमंडळींनाच आमंत्रित करण्यात आले होते.
सामान्यपणे मोठ्या उद्योगपतींच्या विवाहसोहळ्यांना भव्यता आणि प्रसिद्धी मिळते. मात्र, अदानी कुटुंबाने अत्यंत साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने गौतम अदानी यांनी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून 10,000 कोटी रुपयांचा निधी सामाजिक प्रकल्पांसाठी दान करण्याची घोषणा केली.
10,000 कोटी रुपयांच्या निधीतून या निधीतून शाळा, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये उभारली जातील. अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या मते, या नवीन उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत परवडणारी आणि जागतिक दर्जाची रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, उच्च गुणवत्तेच्या K-12 शाळा आणि जागतिक कौशल्य अकादमी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
हा निधी अदानी ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांपेक्षा वेगळा असेल. अदानी ग्रुपच्या कंपन्या त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 2 टक्के रक्कम सामाजिक कार्यांसाठी खर्च करत आहेत.
दरम्यान, वधू दिवा शाह बद्दल सांगायचे तर ती प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमिन शाह यांची कन्या आहे. त्यांचे वडील मुंबई आणि सूरतमधील हिरे व्यवसायाशी जोडलेले असून सी दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मालक आहेत. दिवा आणि जीत यांची साखरपुडा मार्च 2023 मध्ये अहमदाबादमध्येएका खासगी समारंभात पार पडला होता.