अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदाणी ग्रुपवर आर्थिक गडबडीचे गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सला मोठा फटका बसला. मात्र, आता हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद होणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीचे संस्थापक नेथन अँडरसन यांनी सोशल मिडियावर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या हाउस ज्यूडिशियरी कमिटीच्या एका सदस्याने आणि रिपब्लिकन खासदाराने न्याय विभागाकडे हिंडेनबर्गसंदर्भात तपासाची मागणी केली होती. तसेच, डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता अँडरसन यांनी हिंडेनबर्ग रिसर्चचे (Hindenburg Research) काम थांबवत असल्याची माहिती दिली आहे.
उद्योगपती गौतम अदाणी आणि अदाणी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) गंभीर आरोप केले. त्यानंतर ही कंपनी भारतात विशेष चर्चेत आली होती. अँडरसन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ज्या उद्देशाने काम करत होते, तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेणार होतो. तो दिवस आज आहे. 2017 मध्ये स्थापना झाल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगातील फसवणूक, भ्रष्टाचार आणि खराब व्यवस्थापन उघड करण्यासाठी नाव कमावले आहे. कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही. कोणतीही विशेष जोखीम नाही, आरोग्याच्या समस्याही नाहीत आणि कोणतीही मोठी वैयक्तिक समस्या नाही, असेही काम थांबवताना अँडरसन यांनी म्हटले आहे.
अदाणी आणि सेबीवर अहवाल
हिंडेनबर्ग रिसर्चच्या 2023 मध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये अदाणी समूहवर मोठे आरोप केले होते. यामुळे अदाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या. मागील वर्षी हिंडेनबर्गने अहवालात सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पती धवल बुच यांची अदाणी समूहाशी संबंधित ऑफशोर कंपनीमध्ये हिस्सेदारी असल्याचाही आरोप केला होता.