पणजी- दक्षिण गोव्यातील काणकोण पोलिसांनी कोविड काळात सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरण्यास बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणाचा गुन्हा रद्द केला आहे. या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्रही रद्द केले आहे.याबाबतचा आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.
शेळेर-काणकोण येथील दीपक नाईक यांनी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यात त्यांनी राज्य सरकार, काणकोण पोलीस निरीक्षक रामकृष्टा फळदेसाई यांना प्रतिवादी केले. राज्यात कोविडमुळे २०१९ मध्ये लॉकडाऊन लागू केले होते. त्या काळात नागरिकांना मास्कविना फिरण्यास बंदी केली होती. १९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता काणकोण पोलीस स्थानकाचे पोलीस रामकृष्टा फळदेसाई व इतर पोलीस गस्तीवर असताना शेळेर-काणकोण येथे मास्कविना फिरताना नाईक यांच्यासह ३ जण सापडले. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. काणकोण पोलिसांनी तपास पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२४ रोजी काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.दरम्यान, याचिकादार दीपक नाईक यांनी वरील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निकाल देऊन गुन्हा रद्द करण्यात आला .