पेडणे – आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्यावतीने यंदा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या दृष्टीने सरकारने पाउल उचलले आहे.शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून यानिमित्त पत्रादेवी येथील नवीन हुतात्मा स्मारकापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण गोव्यातून लाखो लोकं जोडली जाण्याची शक्यता आहे. अनेक लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे. पेडण्यातून रॅली सुरु होणे ही पेडणेवासियांसाठी अत्यंत आनंदाची बाब ठरली असून दोन्ही मतदारसंघ अगदी जोमाने कामाला लागेल आहेत.पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे हे देखील या रॅलीचे आयोजन करण्याची तयारी करत आहेत.