पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील अडवईच्या जंगलात ‘मलबार ट्री निम्स’ हे फुलपाखरू सापडले आहे.गोवा सरकारने या दुर्मिळ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे.
गोव्यातील काही विशिष्ट ठिकाणीच या दुर्मिळ फुलपाखरांचे अस्तित्व आहे.मात्र हे फुलपाखरू मूळ पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) फुलपाखरू असून ते साधारणपणे एक हजार फुटाच्यावर डोंगर रांगांमध्ये दिसते.पांढऱ्या पंखांवर काळे ठिपके आणि रेषांच्या सुंदर मांडणीमुळे वनराईत ते नजरेत भरते.डोंगर वाटा आणि ओढ्याच्या काठांवर त्यांचे गुंजी घालणे सर्वांना आकर्षित करते.आता याला राज्य फुलपाखराचा दर्जा मिळाला आहे.आपले पर्यावरण समृद्ध आहे. पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती, फुलपाखरू,फुले, वनौषधी झाडे आकाशाला गवसणी घालणारे डोंगर, पावसाळ्यामध्ये ओसंडून वाहणारे धबधबे हा या भागाचा नैसर्गिक क्षेत्राचा अविष्कार आहे.या अविष्कारामध्येच ‘मलबार ट्री निम्स’ हा दुर्मिळ फुलपाखरांचा नजराणा पाहण्याची संधी लाभली आहे,असे अॅड.सुरज मळीक यांनी सांगितले.