गुन्हे नोंद डायरी विस्कळीत कोर्टाने पोलिसांना फटकारले

मुंबई- काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस महासंचालकांनी गुन्हे नोंद डायरी योग्यरित्या ठेवण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. तरीही पोलिसांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना कठोर शब्दात चांगलेच फटकारले. महासंचालकांच्या परिपत्रकाचेही भान ठेवत नाही का? त्यांचे आदेश पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत नाही का? असे संतप्त सवाल उच्च न्यायालयाने संबंधीत पोलिसांना केले
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुन्हा रद्द करण्यासंबंधी एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने पोलिसांच्या गुन्हे डायरी हाताळण्यात हयगयीबद्दल झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पोलिसांवर ताशेरे ओढले. या प्रकरणात डायरीतील पाने क्रमाने लावली नव्हती. हे फौजदारी दंड संहितेच्या कलम १७२ (१- ब ) मधील तरतुदीचे पूर्णपणे उल्लंघन आहे. वास्तविक कुठल्याही गुन्ह्याच्या तपासात दैनंदिन केस डायरी योग्यरीत्या ठेवणे बंधनकारक असते. पण पोलीस हे काम गांभीर्याने करत नाहीत असे म्हणत न्यायालयाने खेरवाडी पोलीस ठाण्याची ही केस पोलीस महासंचालकांकडे पाठविण्याचे आदेश दिले. तसेच पोलीस महासंचालकांनी यावर २८ जूनला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top