नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम ‘मेथाम्फेटामाइन ‘ हे कृत्रिम अंमली पदार्थ जप्त केले.यंदाच्या वर्षांत नौदलाने पकडलेला हा दुसरा मोठा अंमली पदार्थाचा साठा आहे.
गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.अंमली पदार्थाचा साठा घेऊन चाललेली एक बोट भारताच्या समुद्रात घुसली असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नौदलाच्या बोटींनी माग काढत एक संशयित बोट पकडली.या बोटीवर तब्बल ७०० किलोचा अंमली पदार्थाचा साठा आढळून आला.यावेळी आठ परदेशी नागरिकांनाही पकडले.हे सर्वजण इराणी नागरिक आहेत.“सागर मंथन-४” हे सांकेतिक नाव असलेल्या एनसीबीच्या मोहिमेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.