मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते नक्की नाही. शिंदे यांनी आजही आपल्या सर्व बैठका रद्द करून नाराजीचा सूर कायम ठेवला. दुसरीकडे भाजपाने महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून रुपाणी व सीतारामन यांची नावे जाहीर केल्याने भाजपावर आणखी टीका होऊ लागली. कारण रूपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरात ठरविणार असे चित्र निर्माण झाले. फक्त अजित पवार खुशीत आहेत कारण त्यांचे उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांची खाती निश्चित झाली आहेत.
भाजपाचे विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून निवड केली असून ते उद्या मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबरला भाजपाच्या आमदारांची बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होणार आहे. 5 डिसेंबरला सायंकाळी आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे . या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईत सुरू झाली आहे. हा शपथविधी भव्य होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आज मुंबईत आशिष शेलार यांनी बैठक घेतली. मात्र, शपथविधी दोन दिवसांवर आला तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही मौन पाळले आहे. दरे गावाहून परतलेले शिंदे आज दिवसभर ठाण्यातील आपल्या घरातच होते. आजारी असल्याचे सांगून त्यांनी आपले सर्व कार्यक्रम, बैठका रद्द केल्या. ते कुणालाच भेटले नाहीत. त्यामुळे शिंदे खरेच आजारी आहेत की, ते मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजपावर दबाव टाकत आहेत याची चर्चा होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही सत्तास्थापनेबाबत कुठलेही वक्तव्य केले नाही.
महायुतीच्या सरकार स्थापनेचा गेले नऊ दिवस चालू असलेला घोळ आजही सुटला नाही. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत आज शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होईल, असे म्हटले जात होते. परंतु आज महायुतीची कुठलीही बैठक झाली नाही. दिल्लीहून आल्यानंतर दरे गावी गेलेले मुख्यमंत्री काल ठाणे येथे परतले. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावल्याचे सांगितले जात होते. परंतु ही बैठक रद्द करण्यात आली. आजच्या इतर सर्व बैठकादेखील रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच होते. त्यांनी कुणाच्याही भेटीगाठी घेतल्या नाही . ठाण्याला गेलेले विजय शिवतारे , संजय शिरसाट यांनाही शिंदे भेटले नाहीत.
शिंदे यांच्याबद्दल विचारले असता आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत, हे निश्चित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी कोणते पद घ्यावे, कोणते पद घेऊ नये. त्याबाबत आम्ही त्यांना कोणताही सल्ला दिलेला नाही. त्या संदर्भातील निर्णय ते स्वत: घेतील. पक्ष प्रमुख म्हणून आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार भरत गोगावले म्हणाले की, मी सत्तेबाहेर राहून काम करतो, असे शिंदे यांनी आम्हाला सांगितले. परंतु तुम्ही सत्तेबाहेर जायचे नाही. तुम्ही सत्तेत राहूनच काम करायचे असे आम्ही त्यांना सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी आजही आमदारांची वर्दळ होती. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आले होते. शिंदे गटाचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर, धनंजय मुंडे, खासदार अनिल बोंडे यांनीही त्यांची भेट घेतली. अजित पवारांनीही आपल्या देवगिरी बंगल्यावर आज अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र संध्याकाळी महायुतीची कुठलीच बैठक नसताना आणि फडणवीस व शिंदे महाराष्ट्रात असताना ते दिल्लीला रवाना झाले. ते दिल्लीत नेमके कशासाठी गेले याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष सुनिल तटकरे यांनाही त्यांच्या दिल्ली दौर्याची माहिती नव्हती.
भव्य शपथविधीचे नियोजन
40,000 खुर्च्यांची व्यवस्था
5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार असून त्याच्या नियोजनासाठी आज मुंबईत भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी माहिती दिली की, शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा आम्ही घेतला. हा शपथविधी सोहळा अत्यंत भव्य होणार आहे. या सोहळ्यासाठी 40,000 खुर्च्या लावण्यात येणार आहेत. परंतु उपस्थितांची संख्या 70,000 वर जाऊ शकते. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहाणार आहेत. देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी होणार आहेत. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासची सोय करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. विविध धर्माचे संत-महंत उपस्थिती लावणार आहेत. 13 विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली
जाणार आहे. एक मुख्य स्टेज आणि त्याच्या आजूबाजूला दोन छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. मुख्य मंच 60 बाय 100 बाय 8 फुटांचा असणार आहे. या मंचावर पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. तर उजव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फूट लांबीचा मंच असेल. यावर सर्व साधू संत बसतील. डाव्या बाजूला तेवढ्याच आकाराचे आणखी एक स्टेज असेल. या मंचावर छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असतील. मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची बसण्याची व्यवस्था असेल. त्यासाठी 400 खुर्च्या असतील. मुख्य मंचाच्या समोर व्हीआयपींची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तिथे 1000 खुर्च्या असतील.
गिरीश महाजनांनी
शिंदेंची भेट घेतली
आजारी असल्याने दिवसभर घरी असलेल्या एकनाथ शिंदेंची भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी अचानक संध्याकाळी भेट घेतली. शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सकाळपासून कुणाला न भेटणारे शिंदे महाजनांना भेटले. त्यामुळे महाजनांनी शिंदेंसाठी कोणता संदेश आणला याचीच चर्चा होत होती.