गुइलन बॅरे सिंड्रोम आजाराची लक्षणं काय आहेत? वाचा

Guillain Barre Syndrome: पुणे जिल्ह्यात सध्या गुइलन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने डोके वर काढले आहे. या आजारामुळे सध्या शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या आजाराची लागण झालेले 59 रुग्ण सापडले आहेत. हा आजार लाखो व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला होतो. मात्र, आता अचानक या आजाराची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. गुइलन बॅरे सिंड्रोम आजार नक्की काय आहे? आजाराची लक्षण व स्वतःचे संरक्षण कसे करावे? याविषयी जाणून घेऊयात.

गुइलन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) काय आहे?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) एक दुर्मिळ आजार आहे. हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार असून, यामध्ये सुरुवातीला हात-पाय सुन्न होऊ लागतात. हात-पायांना मुंग्या येतात व स्नायू कमजोर होतात. स्नायू कमकुवत झाल्याने रुग्णाला चालणे, फिरणे किंवा श्वास घेण्यातही समस्या येतात.

तज्ञांनुसार, या आजारामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. हा आजार महामारीचे रूप घेण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा संसर्गजन्य आजार नाहीये. 1 लाख व्यक्तींमागे एका व्यक्तीला या आजाराची लागण होऊ शकते. प्रामुख्याने एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने हा आजार होऊ शकतो. मात्र, उपचारानंतर बहुतांश रुग्ण बरे होतात.

या आजाराची लक्षणं काय आहेत?

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लागण होणाऱ्या रुग्णांचे स्नायू कमकुवत होतात. हात-पायांना मुंग्या येतात. तसेच, चालतानाही समस्या येऊ शकते. काही रुग्णांना श्वास घेण्यासही अडचण येते. स्नायू कमकुवत झाल्याने व अशक्तपणामुळे चालताना तोल जाऊ शकतो.