गुंतवणूकदारांचे एका दिवसात 10 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?

Share Market Crash: देशातील शेअर बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशीही पाहायला मिळाली. यामुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 9.3 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 408.52 लाख कोटी रुपयांवर आले आहे. पाच दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती 16.97 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ घोषणा यामुळे प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.बीएसई सेन्सेक्स 1,018.20 अंकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरून दोन आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 76,293.60 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 309.80 अंकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरून 23,071.80 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारात घसरण होण्याची ही आहेत प्रमुख कारणे

ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबतची अनिश्चितता हे शेअर बाजारातील घसरणीचे कारण आहे. ट्रम्प यांनी स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या आयातीवरील टॅरिफ 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर दबाव वाढत चालला असून, जागतिक शेअर बाजारात अधिक अस्थिरता निर्माण झाली आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री  – फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे 12,643 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे बाजारावर सातत्याने दबाव निर्माण झाला आहे. यापूर्वी, जानेवारी महिन्यातही विक्रीचा ओघ मोठा होता.

मिडकॅप-स्मॉलकॅपचे उच्च व्हॅल्यूएशन- मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या उच्च व्हॅल्यूएशनबाबत बाजारात चिंता कायम आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सचे मुल्यांकन अत्यंत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता यातून बाहेर पडत आहेत.