मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने जारी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीची परवानगी देताना काही जाचक अटी-शर्ती घातल्या होत्या. या जाचक अटी-शर्ती मागे घेण्याची विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सह्याद्रीवरील एका बैठकीत केली होती.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अटी-शर्ती मागे घेऊन सुधारित परिपत्रक काढण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते.त्यानुसार पालिकेने याबाबतचे सुधारित परिपत्रक काल जारी केले.
आधीच्या अटी- शर्तीमध्ये मंडळांना ही परवानगी देताना स्वयंघोषणापत्र सादर करण्याचा उल्लेख होता. मागील दहा वर्षात कोणत्याही नियमाचा किंवा कायद्याचा भंग केलेला नाही अशा आशयाचे हे घोषणापत्र अनेक मंडळांना अडचणीचे ठरत होते.दरम्यान,आता अटी-शर्ती मागे घेतल्या असल्या तरी अशा घोषणापत्रासाठी मंडळांना झालेला खर्च परत मिळावा,
यासाठी समन्वय समिती प्रयत्न करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.