नवी दिल्ली – आज संसदीय अधिवेशनात अदानी विषयावर गोंधळ न होता काँग्रेसच्या खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याने मोठा गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित झाली.
आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी निवेदन केले की, राज्यसभा सभागृह काल तहकूब झाल्यानंतर खुर्ची क्रमांक 222 यांच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडले. ही अत्यंत गंभीर बाब असून, याबाबत सखोल चौकशी केली जाईल. सभापती धनखड यांनी ही घोषणा करताच प्रचंड गदारोळ झाला. सभापतींनी या प्रकरणाची गुपचूप चौकशी न करता ही माहिती सभागृहात का दिली हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित झाला. खुर्ची क्रमांक 222 हे सर्वोच्च न्यायालयाचे निष्णांत वकील आणि काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांचे आसन असते. यावरच नोटांचे बंडल सापडले, असे जाहीर करण्यात आले. यामुळे काँग्रेसला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता का? असा संशय व्यक्त झाला. भाजपाने त्वरित हा मुद्दा हाती घेऊन उच्चस्तरीय समितीकडून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा सदनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, याची चौकशी झाली पाहिजे. स्वत:हा अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, काल मी 12.57 मिनिटांनी राज्यसभा सभागृहात गेलो. त्यानंतर तीनच मिनिटांनी दुपारी 1 वाजता सभागृह स्थगित झाले. दुपारी एक ते दीड मी संसदीय इमारतीत जेवण केले आणि मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयात परत गेलो. माझ्यावर व्यक्त झालेला संशय हा हास्यास्पद आहे. मी राज्यसभेत जाताना नेहमी फक्त 500 रुपयांची एकच नोट घेऊन जातो. जो प्रकार घडला त्याची चौकशी निश्चित झाली पाहिजे. नोटांचे बंडल राज्यसभेच्या सभागृहात येते ही गंभीर बाब आहे. राज्यसभेत या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला. सभापती धनखड यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती घोषित केली आणि आज दिवसभराचे कामकाज या गदारोळातच समाप्त झाले. अभिषेक मनू सिंघवी हे तेलंगणाहून नियुक्त झालेले काँग्रेसचे खासदार आहेत. 2024 ते 2026 हा त्यांचा कार्यकाळ आहे. ते अत्यंत प्रसिद्ध वकील आहेत. काँग्रेसने आरोप केला की, अदानी प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी भाजपाने हे नवे कुभांड रचले आहे.