खारेपाट पाणीप्रश्नासाठी वाशीमध्ये ‘गाढवाचे लग्‍न’

रायगड- सरकारने पेण तालुक्यातील खारेपाटच्या पाणी योजनांसाठी ३८ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. मात्र, आजही कामे अपूर्ण असल्‍याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. खारेपाटातील हा पाणीप्रश्‍न निकाली लागावा, यासाठी वाशी येथे उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता नुकतेच गाढवाचे लग्न लावले. या लग्न सोहळ्याकरिता हजारो नागरिकांनी उपस्थित होते.

पाऊस पडला नाही किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली की शेतकरी धोंड्या काढतात किंवा बेडकांची, गाढवाची लग्न लावतात अशी पूर्वापार प्रथा आहे. याच भावनेतून नागरिकांनी उपोषणस्थळी गाढवाचे लग्न लावले. तसेच सरकारने दिलेला शब्‍द न पाळल्‍याबद्दल निषेध व्यक्‍त केला.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाला अनेक सामाजिक,राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.तालुक्यातील वाशी, शिर्की, खारेपाट भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळावे याकरिता खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी खारेपाटाकरिता प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी-शिर्की-खारेपाट हा प्रस्तावित कालवा व रखडलेल्‍या जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती.

तत्‍कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर २०२३ रोजी अधिवेशनात आश्वासन तसेच लेखी पत्र देत हेटवणे मध्यम प्रकल्‍प विभागाचे कार्यकारी अभियंत्‍यांना कामाकरिता एक महिन्यात मंजुरी देतो, असे आश्‍वस्‍त केल्‍यावर उपोषण तात्पुरते स्‍थगित करण्यात आले होते. परंतु त्‍यानंतरही कामे अपूर्ण असल्‍याने खारेपाट विकास संकल्प संघटनेने २४ फेब्रुवारीपासून वाशी येथे उपोषण सुरू केले आहे. मात्र पाच दिवस उलटूनही पाणीप्रश्‍नावर कोणत्‍याही उपाययोजना न केल्‍याने गावकऱ्यांनी गाढवाचे लग्न लावून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top