नवी दिल्ली – महाराष्ट्रातील खातेवाटपाचा प्रश्न सुटत नाही अशा तणावाच्या वातावरणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप निश्चित झाले, अशी घोषणा केली. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी होऊ शकतो, असे सूतोवाचही केले.
आज दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी काल नितीन गडकरी, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांची भेट घेतली. रात्री उशिरा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही प्रदीर्घ भेट घेतली. आज सकाळी ते पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आज पंतप्रधानांशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली. मी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी आमची महाराष्ट्रासंदर्भातही चर्चा झाली. पंतप्रधानांनी मला सांगितले की, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतिशील ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहेत. जे. पी. नड्डा, अमित शहा आणि बी. एल. संतोष यांच्याशीही मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली.
तुम्ही आणि अजित पवार दोघे दिल्लीत असताना एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत दिल्लीला का आले नाहीत, असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाही. तुम्ही चालवत असलेल्या बातम्यांबाबत मी एवढाच खुलासा करेन की, अजित पवार त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले आहेत. मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. एकनाथ शिंदेंचे इथे काही काम नसल्यामुळे ते आलेले नाहीत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत अशा चर्चांमध्ये अर्थ नाही. कालपासून माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेटही झालेली नाही. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलो आहे. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील हे आम्ही ठरवणार आहोत. शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील हे शिंदे ठरवतील. अजित पवार यांच्या पक्षाचे कोण असतील, हे अजित पवार ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय आमचे संसदीय बोर्ड, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. यासाठी काल चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांना भेटलो. त्यांच्याशी मंत्रिपदांबाबत चर्चा केली आहे. प्रत्येक विभागातून मंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात, आपण कुणाला मंत्री बनवू शकतो याची एक यादी आम्ही तयार केली आहे. आता वरीष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. मंत्रिपदवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तुम्हाला लवकरच त्याबद्दल कळेल. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली आहे. गृहखाते नेमके कुणाकडे जाणार, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता फडणवीस यांनी थेट उत्तर न देता, थोडी वाट पाहा, एवढी घाई काय आहे. सगळे सांगतो, एवढेच उत्तर दिले.
शिंदेंचे मन वळविले?
खातेवाटपाचा निर्णय झाला असे फडणवीस आणि अजित पवार म्हणत असले तरी एकनाथ शिंदे दिल्लीला न जाता ठाण्यातच थांबून राहिल्याने त्यांचे मन वळविण्यात खरोखर यश आले का, त्यांना गृह खाते मिळणार की, नगरविकास खात्यावरच समाधान मानावे लागणार हे प्रश्न कायम आहेत.