खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच! अनेकांची दावेदारी! महायुतीत वाद होणार

मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत चुरस पाहायला मिळत आहे. खातेवाटप जाहीर होताच युतीतील नेत्यांनी पालकमंत्रिपदावर उघडपणे दावा करायला सुरुवात केली आहे. खास करून रायगड, सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबईच्या पालकमंत्रिपदासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे आमच्यात पालकमंत्रिपदावरून समन्वय आहे. मतभेद नाहीत, असे महायुतीचे नेते कितीही सांगत असले तरी पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद होण्याची चिन्हे आहेत.
महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यावर आता पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची प्रतीक्षा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संभाव्य नावांची चर्चा होत आहे. 35 जिल्हे आणि 41 मंत्री असल्याने पालकमंत्रिपदाचे वाटप अवघड बनले आहे. अनेक जिल्ह्यांना एकाहून अधिक मंत्रिपदे मिळाली असल्याने तिथे पालकमंत्रिपदाचा पेच निर्माण होऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघातून निवडून आलेले भरत गोगावले यांना रोजगार आणि फलोत्पादन मंत्रिपद मिळाले आहे. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. तर महिला व बालविकास मंत्री असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे याही रायगडच्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अदिती तटकरे यांनीच रायगडचे पालकमंत्रिपद सांभाळले होते. आज भरत गोगावले म्हणाले की, आमच्या नशिबात पालकमंत्रिपद आहे, असे मला वाटते. पालकमंत्रिपदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार. गोगावले यांच्या भूमिकेमुळे शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खटका उडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा दावा केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, माझी पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद भाजपाचे ओबीसी कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनाच मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
नाशिकमध्ये शिंदे गटाचे दादा भुसे, अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ, भाजपाचे गिरीश महाजन यांची नावे पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, जिल्ह्यातील 15 पैकी सात आमदार आमचेच असल्याने नियमाप्रमाणे आम्हालाच पालकमंत्रिपद मिळायला हवे. आम्ही फडणवीस यांच्याकडे तशी मागणी करणार आहोत.
सातारा जिल्ह्यातील आठ पैकी तब्बल चार मतदारसंघांतील आमदार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे अर्धे अधिक मंत्रिमंडळ सातारा जिल्ह्यातील आहे, असे म्हटले जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचे मूळगाव असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे सातार्‍याच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) रस्सीखेच चालू असल्याचे दिसत आहे. भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण), राष्ट्रवादीचे मकरंद पाटील (वाई) शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) यांची नावे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चर्चेत आहेत.
पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात पालकमंत्रिपदावरून चुरस आहे. बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे धनंजय मुंडे या भावंडांपैकी कुणाला पालकमंत्रिपद द्यायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. कोल्हापूरमध्ये भाजपाचे चंद्रकांत पाटील, अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे प्रकाश आबीटकर या तीन मंत्र्यांपैकी पालकमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची, असा बिकट प्रश्न आहे. आमचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत, अशी प्रतिक्रिया हे तिघे देत असले तरी तिघांनाही पालकमंत्रिपद हवे आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्याच पक्षाचे प्रताप सरनाईक आणि भाजपाचे गणेश नाईक यांच्यापैकी पालकमंत्रिपद कुणाला मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. मुंबईच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही आहे.
दरम्यान, राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री तथा शिंदे गटातील नेते शंभूराज देसाई यांनी पालकमंत्रिपदावरून महायुतीत कोणतीही रस्सीखेच नसल्याचे म्हटले. शंभूराज देसाई म्हणाले की, नुकतेच आमचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत आम्हाला आमची खाती सुपूर्द केली जातील. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या दोन दिवसांत मुंबईला जातील. तिथे एकत्र बसून चर्चा करतील. त्या चर्चेवेळी पालकमंत्रिपदांचे वाटप होईल. आमच्यामध्ये मंत्रिपदांवरून रस्सीखेच नव्हती, खातेवाटपावरूनदेखील रस्सीखेच नव्हती आणि आता पालकमंत्रिपदावरूनदेखील रस्सीखेच नाही. तर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, पालकमंत्र्यांचे 99 टक्के वाटप झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो. तिन्ही पक्षांत याबाबत समन्वय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top