खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षे आहे.
या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह खंबाटकी घाटामध्ये टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलिसांनी वर्तविली आहे.बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील वळणालगत एक मालट्रक बंद पडला होता. त्यामुळे ट्रक दुरुस्तीकरीता मेकॅनिक येण्यास उशीर लागत असल्याने चालक जवळच्या कठड्याजवळ उभा होता.त्यावेळी त्याला उग्र वासाची जाणीव झाली. त्यामुळे त्याने दरीत नजर टाकली असता त्याला हा महिलेचा मृतदेह दिसून आला.त्याने तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला.घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढला. प्राथमिक तपासात महिलेल्या डोक्यावर लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केल्याचे दिसून आले आहे. अद्याप या मृत महिलेची ओळख पटलेली नाही.