क्विशिंग स्कॅम काय आहे? बनावट क्यूआर कोडद्वारे कशी होतेय फसवणूक? वाचा

सायबर गुन्हेगार सतत नवीन स्कॅम करण्याच्या पद्धती शोधत असतात. तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती होत असताना, स्कॅमच्या घटना देखील तितक्याच वाढताना दिसत आहेत. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट डिजिटलकडे वळत आहे. ऑनलाइन पेमेंट करणेही यामुळे खूप सोपे झाले असून, यामुळे वेळेचीही बचत होते. केवळ एक क्यूआर कोड स्कॅन केला की काही सेकंदात पैसे पाठवणे शक्य होते. मात्र, आता क्यूआर कोडच्या माध्यमातून करण्यात येणारे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहे.

क्यूआर कोडचा वापर पैसे पाठवण्यासाठी तर होतोच, मात्र विविध गोष्टींची माहिती शेअर करण्यासाठीही क्यूआर कोड मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत.

क्विशिंग स्कॅम काय आहे?

क्विशिंग ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगार बनावट क्यूआर कोडचा वापर करतात. लोक हे क्यूआर कोड स्कॅन करून इतर वेबसाइट्सवर पोहोचतात, या वेबसाइटवर गेल्यावर यूजर्सची खाजगी माहिती किंवा बँकिंग माहिती चोरी केली जाते.

काही क्यूआर कोड्समध्ये असे सॉफ्टवेअर असू शकतात, जे फोनमधील माहिती चोरी करू शकतात. हे सॉफ्टवेअर फोनमध्ये मॅलवेयर किंवा ट्रोजन इंस्टॉल करून व्यक्तिगत माहिती, पासवर्ड्स आणि बँकिंग डिटेल्स चोरू शकतात.

ऑनलाइन फसवणूक कशी टाळाल?

केवळ विश्वासार्ह क्यूआर कोडच स्कॅन करा. अशा क्यूआर कोड्सद्वारे तुमची माहिती चोरी होण्याचा धोका खूप कमी असतो.

अनोळखी नंबरपासून सावध राहायला हवे. जर कोणी अनोळखी नंबरवरून तुम्हाला फोन करून लॉटरी, क्विझ किंवा कोणत्याही प्रकारचे मोठे बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवत असेल, तर त्वरित सावध व्हायला हवे.

सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला व्यक्तिगत माहिती, जसे की बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर किंवा ओटीपी, देऊ नका.

तसेच, ऑनलाइन फसवणूक झाल्यास ताबडतोब बँक, स्थानिक पोलिस किंवा सायबर क्राइम सेलला माहिती द्या.