कोस्टल रोडचे झाले लोकार्पण, आता मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर फक्त 15 मिनिटात गाठता येणार

Coastal Road: जवळपास 7 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण पार पडले. कोस्टल रोड प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या नॉर्थ चॅनल ब्रिजचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

आतापर्यंत या प्रकल्पाचे 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाल्याने आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाठता येणार आहे. नव्याने बांधलेला कनेक्टर ब्रिज थेट कोस्टल रोडच्या दक्षिण आणि उत्तर मार्गिकांना वरळी-वांद्रे सी-लिंकशी जोडतो. सी लिंकच्या दक्षिण मार्गिकेतून प्रवास करणारी वाहने आता या कोस्टल रोड कनेक्टर ब्रिजद्वारे थेट नरिमन पॉइंटकडे जाऊ शकतात.

बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी इंटरसिटी आणि मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार आहे.

या मार्गांसाठी वाहनांसाठी स्पीड मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. कोस्टल रोड कनेक्टर ब्रिज- 80 किमी/तास, टर्निंग पॉइंट- 40 किमी/तास आणि कोस्टल रोड ब्रिज उतार- 30 किमी/तास स्पीड मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.