कोल्हापूर :
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नागरिकांचा जीव टांगणीला आला होता. मात्र आता कृष्णा नदीची पाणी पातळी काही इंचानी उतरली असून पाणी स्थिर आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ९५ बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यातील एकूण ४ हजार ६२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्याचबरोबर जनावरांचाही स्थलांतर करण्यात आले होते. या पुरामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये भात, सोयाबीन, ऊस, आणि भाजीपाला अशी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील सर्वच रस्त्यांवर पुराचे पाणी साचले होते. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलसह इतर कचरा शहरातील रस्त्यांवर साचला असून सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.