कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला गती येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
ऐतिहासिक,सांस्कृतिक समृद्धतेची साक्ष देणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट रोजी जळाले. या दुर्घटनेनंतर कोल्हापूर शहरात आणखी एका नाट्यगृहाची गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.त्यातून नव्या नाट्यगृहासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे.मात्र, किमान एक हजार क्षमतेच्या आणखी एका नाट्यगृहाची शहरात असलेली गरज ओळखून नव्या नाट्यगृहासाठी महापालिकेने दोन जागा प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर हे नाट्यगृह उभारले जाणार आहे.