नवी दिल्ली – कोलकातातील आंदोलनकर्त्या दोन महिला डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत झालेल्या कथित छळाची सीबीआय चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले. याप्रकरणाची सीबीआयऐवजी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांनी मोठे आंदोलन केले होते.आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. त्यामध्ये दोन महिला डॉक्टरांचा सहभाग होता. या महिला डॉक्टरांचा कोठडीत छळ करण्यात आला,असा आरोप करीत निवासी डॉक्टरांनी केलेली मागणी पश्चिम बंगाल सरकारने अमान्य केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने डॉक्टरांचे म्हणणे ग्राह्य धरून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या याचिकेवर आज न्या. सूर्य कांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.त्याप्रसंगी कोलकाता न्यायालयाचा आदेश रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.एसआयटीच्या तपासावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाला दिले.