सातारा – राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही ईव्हीएम, व्हीव्हीपॅट तपासणीची तक्रार केली असून त्यासाठीचे शुल्क ८ लाख ४९ हजार ६०० रुपये शुल्क निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भरले आहे. ही मतदान यंत्रे बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) या कंपनीच्या अभियंत्यांकडून तपासली जाणार आहेत.
कोरेगाव मतदारसंघातील १८ मतदानयंत्राची तपासणी होणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नोटासह १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात खरी लढत महायुती-शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे व मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात होती. या निवडणुकीत महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते मिळाली. तर शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला. त्यांनी मतदान यंत्रे पडताळणीची मागणी केल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता आहे.