रत्नागिरी – कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी मच्छीमार नौका सुरक्षित होऊन या नौकांवर काम करण्यासाठी खलाशी आणि इतर कामगारवर्ग मिळावा यादृष्टीने सहायक मत्स्य व्यवसाय विभाग एक योजना बनवत आहे.या योजनेंतर्गत जुन्या लाकडी नौकांना फायबर बॉडी लावून समुद्रातील मासेमारीसाठी सुरक्षित केल्या जाणार आहेत. या कामासाठी येणारा खर्च सिंधुरत्न योजनेतून मिळावा यासाठीचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य आमदार किरण सामंत यांच्याकडे दिला जाणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले.
या दोन्ही जिल्ह्यात हजारो लाकडी मच्छीमार नौका आहेत.यातील अनेक नौका जुन्या असून या लाकडी नौकांवर काम करण्यास भीती वाटत असल्याने खलाशी मिळत नाहीत.त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज असलेल्या अनेक नौका मासेमारीसाठी समुद्रात जावू शकत नाहीत. राष्ट्रीय सहकार विकास प्राधिकरणाकडून घेतलेले कर्ज वसूल होत नाही.फायबरमुळे नौका सुरक्षित झाल्यानंतर बंद नौका पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जाऊ शकतील. यामुळे एनसीडीसीने नौका बांधणीसाठी दिलेली आर्थिक मदत वसूल होण्यास मदत होवू शकणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी अशा सुमारे ४ हजार मच्छिमार नौका आहेत.त्यातील सुमारे दीड हजार लाकडी नौका वापरात आहेत.हीच स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असून या सर्व जुन्या नौकांवर भीतीमुळे खलाशी आणि इतर कर्मचारी वर्ग मिळत नाही.जुन्या लाकडी नौकांमध्ये समुद्रातील पाणी भरण्याची भीती असल्याने कामगार वर्ग मिळत नाही, अशा नौकांना फायबर बसवून सुरक्षित केल्यास कामगार वर्ग मिळेल आणि मासेमारी सुरू झाल्यानंतर आर्थिक उत्पन्न सुरु होवून कर्जाचे हप्तेही फेडता येणार आहेत.