लखनऊ – कानपूरच्या प्रसिद्ध केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा यांचा उत्तर प्रदेशातील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. हरीश मखिजा, त्यांची पत्नी, मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा आणि दीपक कोठारी एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कानपूरहून आग्र्याला जात असताना ही दुर्घटना घडली. काल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेच्या ७९ किलोमीटरवर कानपूरहून आग्राच्या दिशेने जाणारी कार अचानक टायर फुटल्यामुळे नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाला धडकल्यानंतर उलटली. या अपघातात प्रीती माखिजा गाडीतून खाली पडल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उत्तर प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या आपत्कालीन ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
