नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक नवी दिल्ली मतदारसंघातून लढणार हे आता निश्चित झाले आहे. केजरीवाल दुसऱ्या मतदारसंघातून लढतील अशी चर्चा होती. मात्र काल केजरवाल यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला. आपण नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार असे केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले.
ही लढत मुख्यमंत्री पुत्र विरूध्द सामान्य माणूस अशी होणार आहे,असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून दिल्लीच्या तीनदा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपा माजी मुख्यमंत्री साहीब सिंह वर्मा यांचा पुत्र परवेश सिंह यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्याचा संदर्भ देत केजरीवाल यांनी हा टोला हाणला. आपच्या नेत्या आणि दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यादेखील मतदारसंघ बदलणार नाहीत. त्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील असे केजरीवाल यांनी सांगितले.