मुंबई- कुर्ला पश्चिमेला सोमवार ९ डिसेंबरला रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४३ जण जखमी झाले. जखमींवर सध्या भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी चालक संजय मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशामध्ये बस चालक संजय मोरे यांच्या पत्नी मनीषा मोरे यांनी बसमध्येच दोष असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय मोरेची पत्नी मनीषा मोरे म्हणाल्या की, माझ्या नवऱ्याने जवळजवळ ३० ते ३५ वर्षे ड्रायव्हिंगचे काम केले आहे. जुन्या कंपनीमध्ये त्यांनी अनेक चांगल्या चारचाकी चालवल्या. माझ्या नवऱ्याचा बेस्ट बिल्ला देखील खूप जुना आहे. त्यांनी बेस्टमध्ये छोट्या बस ३ वर्षे चालवल्या आहेत. संजय मोरे यांनी पहिल्यांदाच बस चालवल्याचा आरोप केला जात आहे त्यावर त्या म्हणाल्या की, ‘या मोठ्या बसची त्यांना ट्रेनिंग दिली आहे. त्याच्यानंतर १ डिसेंबरपासून ते रूजू झाले होते. कालच पहिल्यांदा गाडी हातात घेतली आणि ठोकली असा काहीही विषय नाही. उगाच त्यांची बदनामी करू नका. माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा नवरा कोणतीच गाडी ठोकू शकत नाही आणि कोणाचे नुकसान करू शकत नाही. जे झाले त्याबद्दल मी माफी मागते. असे व्हायला नको होते. ते मुद्दाम असे काही करू शकत नाहीत. त्यांना गाडी कंट्रोल झाली नसेल. गाडीमध्ये काही तरी फॉल्ट असेल. गाडी चेक करून माझे मिस्टर गाडीमध्ये चढतात. तिथे फोटो काढलेला असतो, वहीमध्ये नोंद असते. गाडीमध्ये काही तुटले आहे, फुटले आहे याचा आधी फोटो काढून घेतला जातो. त्यानंतरच गाडी चालवली जाते. कामावर गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने बसचा एक राऊंड केला होता. दुपारची शिफ्ट होती . त्याच्यानंतर शेवटच्या फेरीत असे झाले म्हणजे गाडीमध्ये काहीतरी खोट असू शकते. माझा नवरा वेगात गाडी चालवत नाही. गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार त्याच्यामुळे त्या बसवरील त्याचा ताबा सुटला असेल.